विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला जीवदान ; उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबी दारफळ येथे WCAS व वनविभाग टीमने केलेले रेस्क्यू ऑपरेशन पहाच

 
सोलापूर :- 26 नोव्हें. 2022 रोजी सकाळी 8 च्या दरम्यान माळढोक पक्षी अभयारण्याचे वनपाल गुरुदत्त दाभाडे यांचा WCAS चे सुरेश क्षिरसागर यांना फोन आला की, बीबी दारफळ येथील शेतकरी संदीप जाधव त्यांच्या शेतातल्या विहिरीत एक कोल्हा पडला असून त्यांनी याबाबत मदतीचे आवाहन केले. सुरेश क्षीरसागर परगावी असल्याने त्यांनी या घटनेची माहिती WCAS चे अजित चौहान व संतोष धाकपाडे यांना दिली. चौहान यांनी सोलापूर वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक खलाने यांना सदर घटनेची माहिती दिली व रेस्क्यूचे साहित्य घेऊन कर्मचाऱ्यांना याठिकाणी पाठविण्याची विनंती केली.

त्याआधी वाईल्डलाईफ काँझर्वेशन असोसिएशनचे  सदस्य बीबीदारफळला दुचाकीवर रवाना झाले व शेतात विहीरीवर जाऊन पाहणी केली असता साधारण 30 ते 40 फूट पायऱ्या नसलेल्या एका विहिरीत कोल्हा पडल्याचे त्यांना दिसून आले आणि तो कोल्हा विहिरीतच एका छोट्याशा कपारीमध्ये आसऱ्यासाठी बसल्याचे दिसून आले. सुरुवातीचा प्रयत्न म्हणून उपलब्ध असलेला एक पिंजरा विहिरीत सोडून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला परंतु तो कोल्हा त्या पिंजऱ्यामध्ये आला नाही.

वन विभागाची गाडी आल्यानंतर मोठा लोखंडी पिंजरा दोरी बांधून विहिरीत सोडण्यात आला; परंतु कोल्हा त्यामध्ये न येता पाण्यातच घुटमळत होता. सरतेशेवटी वन विभागाचे वाहनचालक मुन्ना नरवणे यांनी प्रसंगावधान राखून विहिरीत उतरण्याचे ठरवले व विहिरीत उतरून अथक प्रयत्नानंतर अलगदपणे त्या कोल्ह्याला लोखंडी पिंजऱ्यामध्ये बंदिस्त करण्यात त्यांना यश आले. पिंजरा विहिरीतून बाहेर काढल्यानंतर त्या कोल्ह्याला जवळच त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये सोडून देण्यात आले. पिंजऱ्याची जाळी (दार) उघडताच कोल्ह्याने रानात धूम ठोकली.


या बचाव कार्यात WCAS चे  अजित चौहान, संतोष धाकपाडे, ओंकार घुले, शेतकरी संदिप जाधव, रणजित पवार तसेच सोलापूर वनविभागाचे वनपाल श्रीहरी पाटील, वाहनचालक मुन्ना निरवणे व अजय हिरेमठ यांनी सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments