सोलापूर प्रतिनिधी शासनाने अर्थसंकल्पात महिलांना एस.टी. प्रवास भाड्यामध्ये 50 टक्के सवलतीची घोषणा केली तर या योजनेची महिला सन्मान योजना असे नामकरण करून 17 मार्चपासून अंमलबजावणी सुरू झाल्यामुळे महिला प्रवाशांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र राज्याच्या सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये सर्व महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाड्यामध्ये 50 टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती मात्र याची अंमलबजावणी केव्हा होणार याची प्रतीक्षा असताना शासनाच्या घोषणेनुसार राज्य परिवहन महामंडळाचे वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक एस. एम. जगताप यांनी 17 मार्चपासून सवलत योजनेचे परिपत्रक काढून अंमलबजावणी सुरू केली. या निर्णयामुळे महिला प्रवाशांना आता साधी, मिडी / मिनी, आराम विना वातानुकूलीत शयन – आसनी, शिवशाही, शिवनेरी, शिवाई या सर्व प्रकारच्या बसमध्ये प्रवासी भाड्यात 50 टक्के सवलत मिळणार आहे.
राज्य शासनाने अर्थसंकल्प दरम्यान केलेल्या घोषणेची अंमलबजावणी करून महिलांचा सन्मान वाढवला आहे. यापूर्वी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75 वर्षापुढील नागरिकांना मोफत प्रवास, शालेय मुलींसाठी सवलत आदी योजना देखील सुरू केल्या. नारीशक्तीस बळ देणाऱ्या या महिला सन्मान योजनेमुळे महिलांना उद्योग व्यवसाय यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.
■महिलांचा सन्मान वाढवणारी योजना*
राज्य शासनाने अर्थसंकल्पात महिलांना 50 टक्के सवलतीच्या घोषणांची अंमलबजावणी करून शासनाने महिलांचा सन्मान वाढवला आहे. गरीबांचे वहान म्हणून समजली जाणारी लालपरी आता महिलांच्या अपेक्षित ध्येयपूर्तीसाठी महत्त्वाची घटक ठरेल.
*सौ कविता घोडके-पाटील*
माजी सरपंच, ग्रामपंचायत भागाईवाडी
0 Comments