सोलापूर : पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होणार्या भाविक व वारकर्यांना यंदा पिण्यासाठी थंड पाणी देण्याकरीता जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असून प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी प्राथमिक स्तरावर जिल्हा दूध संघ व काही साखर कारखान्यांच्या पदाधिकार्यांची चर्चा करून टँकर उपलब्ध करून देण्याची सूचना केली आहे.
लांबलेला पाऊस, वाढते तापमान आणि एक महिना अगोदर आलेल्या आषाढी वारीमुळे पाण्याविना भाविकांचे हाल होऊ नयेत, यासाठी प्रशासन खबरदारी घेत आहे. दरम्यान, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नुकताच पंढरपूर दौरा करून पालखी मार्ग व मुक्कामांच्या ठिकाणांची पाहणी करून काही सूचना केल्या आहेत. त्यात पिण्याच्या थंड पाण्याचाही समावेश आहे. यंदा आषाढी वारी एक महिना अगोदर आली आहे. तसेच अजुनही पावसाचा पत्ता नाही. अशा स्थितीत वारकर्यांचे पाण्यामुळे हाल होऊ नयेत, यासाठी प्रशासनाने वारकर्यांना पालखी मार्ग व मुक्कामाच्या ठिकाणी पिण्यासाठी थंड पाणी देण्याबाबत विचार करण्याची सूचना प्रभारी जिल्हाधिकारी ठोंबरे यांना विखे-पाटील यांनी केली होती.
त्यानुसार ठोंबरे यांनी शुक्रवारी तत्काळ जिल्हा दूध संघ व काही साखर कारखानदारांच्या पदाधिकार्यांची बैठक घेऊन थंड पाणी उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा केली आहे. साखर कारखान्यांनी 10 टँकर द्यावेत व दूध संघाने त्यांच्याकडील प्लॅन्टमध्ये पाणी थंड करून द्यावे, असा प्रस्ताव प्रभारी जिल्हाधिकारी ठोंबरे यांनी ठेवला आहे. यासाठी दूध संघ व साखर कारखानदारांनी सकारात्मकता दर्शविली आहे.
पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी आळंदी येथून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज माऊली पालखी सोहळा व देहू येथून जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा निघणार आहे. तसेच शेगाव येथून गजानन महाराजांचा पालखी सोहळाही सोलापूरमार्गे पंढरीत दाखल होत असतो. याशिवाय इतर संतांच्या अनेक पालख्या व दिंडी सोहळे सोलापूर जिल्हयात येत असतात. यात सहभागी होणार्या वारकर्यांना जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून पिण्यासाठी थंड पाणी मिळणार आहे.
Comments
Post a Comment